Home महाराष्ट्र ‘बार उघडले पण मंदिरे बंदच?’ अमृता फडणवीस यांचा सरकारला सवाल

‘बार उघडले पण मंदिरे बंदच?’ अमृता फडणवीस यांचा सरकारला सवाल

0

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या ७ महिन्यांपासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद आहेत. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सिनेमगृहे, उपहारगृहे, बार अशा बऱ्याच गोष्टी उघडल्या जाऊन पूर्वपदावर येत आहेत. मात्र मंदिरे उघडण्यासाठी सरकारने अद्यापही परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यभरातून मंदिरे खुली करण्याची मागणी केली जात आहे. या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं होतं. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना मंदिरे न उघडल्याबाबत जाब विचारला व आपण धर्मनिरपेक्ष झालात का असा सवाल केला. याला प्रत्युत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले की माझ्या हिंदुत्वाला प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

हा वाद रंगला असतांनाच अमृता फडणवीस यांनी त्यात उडी घेतली आहे. ‘बार व दारूची दुकाने उघडी असलेली चालतात आणि मंदिरे मात्र डेंजर झोन आहेत का?’ असा प्रश्न त्यांनी ट्विटमध्ये विचारला. तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेल्या उत्तराशी संबंधित खोचक टोला त्यांनी दिला. ‘प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी काही वेळा प्रमाणपत्राची आवश्यकता नक्कीच असते’ असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.