
अनेक दिवसांपासून राज्यातील बंद असलेली मंदिरे खुली करण्याच्या प्रश्नावर वाद सुरु आहेत. गेल्या ७ महिन्यांपासून कोरोनामुळे सर्व प्रार्थनास्थळे बंद आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून भाजपकडून तसेच अनेक संस्थांकडून मंदिरे पुन्हा उघडण्यासाठी मागणी होत होती. परंतु सरकारने अद्याप मंदिरे उघडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भाजप नेते आता या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. ‘येत्या १ नोव्हेंबरपासून मंदिरे खुली न केल्यास आम्ही मंदिरांची टाळी फोडू’ असा इशारा भाजपच्या तुषार भोसले यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीने राज्यपालांची भेट घेऊन या मुद्द्यावर चर्चा केली होती. त्याबद्दल रस्त्यापालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत पात्र पाठवले होते. तो वाद बरेच दिवस चालला मात्र मंदिरे खुली करण्याबाबत काहीही निर्णय सरकारने दिला नाही. याआधी आध्यात्मिक आघाडीने सरकारला मंदिरे उघडण्यासाठी दसऱ्यापर्यंतची मुदत दिली होती. मात्र तरीही सरकारने काहीच केले नसल्याने भाजपने आता १ नोव्हेंबरची अखेरची मुदत सरकारला दिली आहे. १ नोव्हेंबरलाही मंदिरे खुली न केल्यास आम्ही टाळी फोडू असा इशारा भाजपने केला आहे.