Home महाराष्ट्र या तारखेपासून सुरु होणार महाराष्ट्रातील चित्रपटगृहे!

या तारखेपासून सुरु होणार महाराष्ट्रातील चित्रपटगृहे!

0

अनलॉक ५ च्या गाईडलाईन्समध्ये केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने चित्रपटगृहे उघडण्यास अद्याप परवानगी दिली नव्हती. याबद्दल राज्य सरकारने निर्णय दिला असून येत्या ६ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी दिली आहे. चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी यासंदर्भातील माहिती ट्विट करून कळवली.

गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद असल्याने या काळात बरेच चित्रपट नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, डिस्ने हॉटस्टार अशा ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर रिलीज करण्यात आले. आता अखेर चित्रपटगृहे खुली होणार असल्याने चित्रपटप्रेमींना पुन्हा मोठ्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्याचा आस्वाद घेता येणार आहे. परंतु चित्रपटगृहे सुरु करण्याआधी माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या नियमावलीचे पालन थिएटर मालकांना व प्रेक्षकांनाही करावे लागणार आहे.

या नियमावलीतील नियम पुढीलप्रमाणे:
१. चित्रपटगृहांमध्ये ५०% प्रेक्षकांची उपस्थिती बंधनकारक आहे.
२. चित्रपट पाहतांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे.
३. चित्रपटगृहात प्रवेश करण्याआधी थर्मल स्क्रीनिंग करणे अनिवार्य आहे.
४. लक्षणे आढळून आलेल्या प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये प्रवेश निषिद्ध आहे.
५. प्रेक्षकांना हँडवॉश तसेच हॅन्ड सॅनिटायझर पुरवणे आवश्यक आहे.