Home महाराष्ट्र पुणे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे पुण्यातील जागावाटप निश्चित

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे पुण्यातील जागावाटप निश्चित

0

विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. केवळ एका महिन्याचा अवधी राहिला असल्यामुळे राजकीय पक्षांची चलबिचल सुरू आहे. अशात आघाडीने लढणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांचे जागावाटप ठरले असल्याचे समजले. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलेल्या घोषनेनुसार काँग्रेस-राष्ट्रवादी विधानसभेत आघाडीने लढणार असून दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढवणार असे समजले. त्यानंतर काल अजित पवार यांनी पुण्यात एका कार्यकर्ता मेळाव्यामध्ये पुण्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाची घोषणा केली.

या मेळाव्यादरम्यान अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना पुण्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला समजावून सांगितला. आघाडीमध्ये विधानसभेच्या पुण्यातील आठ जागांपैकी ४ जागा राष्ट्रवादी आणि ३ जागा काँग्रेस लढवेल आणि उरलेली १ जागा मित्रपक्ष लढवतील असे पवारांनी सांगितले. ही एक जागा मनसे लढवणार असे बोलले जात आहे. राष्ट्रवादी पुण्यातील खडकवासला, पर्वती, हडपसर आणि वडगाव शेरी या चार मतदारसंघांतून निवडणूक लढवेल, तर काँग्रेस कसबा, शिवाजीनगर, कॅन्टोनमेंट या मतदारसंघांतून आणि मित्रपक्ष कोथरूड मतदारसंघातून जागा लढवेल असेही अजित पवारांनी सांगितले.