
राज्यात अघोषित आणिबाणीसदृश आणि अभूतपूर्व झालेली अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण केले जात आहे तसेच कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे असा आरोप भाजपाने राज्य सरकार वर केला होता. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तसे पत्रही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांगलाच समाचार घेतलाय.
राज्याचे नेतृत्व ज्यांनी गेली ५ वर्षे केलंय, त्यांनी अशी टीका करणे योग्य नसल्याचे देशमुख यांनी या बाबतीमध्ये म्हटलंय.
राज्य सरकारला यासंदर्भात जाब विचारा अशी विनंती भाजपाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजपाच्या नेत्यांनी राज्यपालांची मंगळवारी भेट घेतली होती. या भेटीवर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी ट्विटरद्वारे अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
कोरोनाच्या संकटकाळात देवेंद्र फडणवीस रस्त्यावर दिसण्यापेक्षा राजभवनात जास्त दिसतात. सध्याच्या परिस्थितीत राजकारण न करता, सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहकार्य केलं पाहिजे, असा जोरदार टोला देशमुख यांनी लगावला. तसेच, एखाद्या ग्रामपंचायत सदस्याने किंवा नगरसेवकाने अशा पद्धतीची टीका केली तर आपण समजू शकतो, मात्र राज्याचे पाच वर्षे नेतृत्व करणारे फडणवीस यांनी अशा पद्धतीने टीका करणे योग्य नाही. आपत्तीच्यावेळी राजकारण करणे हे योग्य नाही, असेही देशमुख यांनी म्हटले.