विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणातील विरोधी भाऊ बहीण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वादाची चर्चा राज्यात उफाळून आली आहे. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी परळी वैजीनाथ येथे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. तसेच पंकजा मुंडेंबद्दल भाषणात बोलतांना आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप चुकीचा आहे असे त्यांनी सांगितले.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तसेच भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याबद्दल भाषणात बोलतांना त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी अपशब्द वापरले असल्याची व्हिडीओ क्लिप काल सोशल मीडियावर व्हायरल होत होती. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्यावर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला होता. तसेच ती व्हिडीओ क्लिप बघितल्यामुळेच पंकजा मुंडे भोवळ येऊन स्टेजवर कोसळल्या असे देखील सगळीकडे बोलले जात होते. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन ती व्हिडीओ क्लिप बनावट असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “सलग दोन तीन तास भाषण करणे सोपे नाही. त्यामुळे ताण येऊन भोवळ येण्यासारख्या घटना घडू शकतात. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणारा मी नाही.” हे बोलतांना त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते.
याशिवाय त्यांनी फेसबुकवर पोस्ट करूनही आपली बाजू मांडली. त्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, ‘व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओ क्लिपमध्ये एडिटिंग करून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. त्या क्लिपची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी. अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहीण भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा.’ धनंजय मुंडेंनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे तात्पुरता तरी या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. तसेच यावर पंकजा मुंडे काय मत मांडतात यावर सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.