
गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेला भाजप-शिवसेना युतीचा प्रश्न अखेर काल मार्गी लागला. परंतु जागावाटप अजूनही टांगणीला होते. भाजपने आज १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यावर भाजपला १२५ पेक्षा जास्त जागा मिळणार असा अंदाजा बांधण्यात येत होता. हा प्रश्न देखील एकदाचा मार्गी लागला असून भाजप १४६ तर शिवसेना १२४ जागांवर निवडणूक लढवणार आहे असे नुकतेच जाहीर झाले. याशिवाय १८ जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत असेही मीडिया न्यूजवरून समजले.
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरी युतीची घोषणा होत नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. अखेर काल सायंकाळी चंद्रकांत पाटील व सुभाष देसाई यांची स्वाक्षरी असलेल्या एका पत्रकाद्वारे युतीची घोषणा करण्यात आली. परंतु या पत्रकात कोणत्या पक्षाला किती व कोणत्या जागा मिळणार हे स्पष्ट केलेले नव्हते. त्यानंतर भाजपने आज जाहीर केलेल्या १२५ उमेदवारांच्या यादीनंतर पुन्हा या चर्चेला उधाण आले होते. पण एकदाची जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा झाल्यामुळे या चर्चांना तात्पुरता तरी आळा बसला आहे. यात भाजपला १६४ जागा मिळाल्या असून त्यातील १८ जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत असे समजले. तसेच शिवसेनेने १२४ जागांवर समाधान मानून लहान भावाची भूमिका स्वीकारली असे सगळीकडे बोलले जात आहे.