
फेब्रुवारी महिना सुरू झाला म्हणजे तरुण पिढीला व्हॅलेंटाईन्स वीकची ओढ लागते. या वेळेत प्रेमाचे प्रतीक मानले जाणाऱ्या गुलाब फुलाची विक्री प्रचंड वाढते. महाराष्ट्रातील मावळ तालुक्यातील गुलाब तर परदेशातही निर्यात केले जातात. यंदाचा व्हॅलेंटाईन्स डे १० दिवसांवर आल्याने मावळात गुलाबांच्या निर्यातीची तयारी जोमात चाललेली दिसून येत आहे.
लोकमतच्या रिपोर्टनुसार मावळ तालुक्यात जवळपास ६५० एकरांच्या क्षेत्रावर पॉलिहाऊसच्या माध्यमातून गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. व्हॅलेंटाईन्स डे ची क्रेझ परदेशात जास्त असल्याने तेथे गुलाबाची मागणीही जास्त असते. तेथे लागणारी सुमारे ६० टक्के फुले ही मावळ येथून निर्यात केली जातात. मावळ येथील पवना फुल उत्पादक संघाच्या माध्यमातून चंद्रकांत कालेकर, ज्ञानेश्वर आडकर, विश्वनाथ जाधव, ज्ञानेश्वर ठाकर, मुकुंद ठाकर या पाच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पॉली मावळातील गुलाब माल विदेशात विक्रीसाठी पाठवण्याची एक स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. यंदा या गुलाबांना भारतात तसेच विदेशी बाजारात चांगला भाव मिळेल अशी मावळ येथील शेतकऱ्यांना आशा आहे. यावर्षी येथून सुमारे ५० लाख गुलाबाची निर्यात होणार आहे असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. लाल रंगाच्या टॉप सिक्रेट या गुलाबाला परदेशात मोठी मागणी असते.