प्राईम नेटवर्क : शिवजयंतीचे औचित्य साधून लातूरच्या क्रीडा संकुलावर १ लाख ११ हजार ८४३ स्क्वेअर चौरस फुटात छत्रपती शिवरायांची विश्वविक्रमी रांगोळी काढलेल्या अक्का फाउंडेशनने आता निलंगा येथे तब्बल सहा एकरात आळीवाचे बिजारोपण करून शिवछत्रपतींची प्रतिमा साकारली आहे. वृक्ष संगोपन अन पर्यावरण संतुलनाचा संदेश देणारी ही पर्यावरण पूरक शिवप्रतिमा एकमेव असल्याचा दावा फाउंडेशनने केला आहे.
दोन लाख चाळीस हजार स्क्वेअर फुटातील या प्रतिमेसाठी दीड हजार किलो अळिवाचे बीज वापरण्यात आले आहे. निलंगा शहरातील दापका रोडवर एन.डी.नाईक यांच्या शेतात ही प्रतिमा अंकुरली आहे.शिवरायांची ही प्रतिमा साकारण्यापूर्वी जमीन समतल करण्यात आली. तिची चांगली मशागत करण्यात आली. त्यानंतर निपाणीकर व त्यांच्या चमूने पांढऱ्या रंगाच्या रांगोळीने शिवप्रतिमा काढली व त्यावर हाताने आळीव पेरण्यात आले.
अळीव लवकर अंकुरनारी, गतीने वाढणारी,आपल्या रूपाने गर्द हिरव्या रंगाचा शिडकावा करणारी,मनमोहक वनस्पती असल्याने तिचा शिवप्रतिमेसाठी वापर करण्यात आल्याचे मंगेश निपाणीकर म्हणाले. पेरलेल्या बिजास तुषार संचाने पाणी देण्यात आले व अवघ्या पाच दिवसात त्यातून शिवछत्रपती प्रतिमा रूपात आकाराला आले. माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या प्रेरणेतून,अक्का फाऊंडेशनचे अरविंद पाटील यांच्या संकल्पनेतून व पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश निपाणीकर या कलाकाराने ही प्रतिमा साकारली आहे.
ही प्रतिमा अधिक देखणी व उठावदार दिसावी याकरिता प्रतिमेच्या पार्श्व बाजूस ५० हजार किलो रांगोळीचा वापर करण्यात येणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या हस्ते या शिवप्रतिमेचे पूजन होणार असून ती नागरिकांना पाहण्यास उपलब्ध होणार आहे.
वृक्षारोपण,वृक्षसंगोपन आणि राष्ट्रीय ऐक्य हा मुख्य हेतु ठेवून शिवजयंती दिवशी ‘अक्का फाउंडेशन’ तर्फे विद्यार्थ्यांना तुळस आणि वडाच्या बियाचे एक लाख सीडपेपर वाटण्यात येणार आहे. तुळस आणि वटवृक्ष भारतात पूजनीय तर मानले जातातच पण ते प्राणवायू पण मुबलक प्रमाणात देतात.