Home अर्थजगत “जर नशेमधून अर्थव्यवस्था वाचणार असेल तर आम्हाला गांजा पिकवायची परवानगी द्या”, राज्यातील...

“जर नशेमधून अर्थव्यवस्था वाचणार असेल तर आम्हाला गांजा पिकवायची परवानगी द्या”, राज्यातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांना मागणी

0

राज्याची आर्थिक घडी बिघडल्यानंतर राज्य सरकारने महसूल जमा होण्यासाठी अनेक युक्त्या वापरायला सुरुवात केली आहे, त्यापैकीच एक म्हणजे सरकारचा दारूची दुकाने परत सुरू करण्याचा निर्णय. एकीकडे कोरोनाचा हाहाकार सुरू असतांना मद्यप्रेमी करोडोंचा व्यवहार करत सरकारला महसूल मिळवून देत आहेत.

“जर लोकांना नशेच्या खाईत ढकलून सरकारला महसूल मिळत असेल तर आम्ही शेतकऱ्यांनी कुणाचे काय बिघडवले आहे, आम्हाला सुद्धा अर्थव्यवस्था सुधारित करायची आहे, देशाच्या प्रगतीला हातभार लावायचा आहे. कृपया आम्हाला सुद्धा गांजाची शेती करू द्या, लोकांच्या नशेपूरता का होईना आम्हाला देशासाठी काही करता येईल आणि अनिश्चित अशा आमच्या शेतीला नवीन सुगीचे दिवस येतील”, अशी भावनिक मागणी राज्यातील शेतकरी करत आहेत.

लॉकडाऊन च्या काळात कोट्यावधी रुपयांचा शेतमाल शेतात सडत पडला आहे. शहरातील ग्राहकांना फळे व भाजीपाला मिळेना. शेतकऱ्यांना कुणी वाली राहिला नाही. नशेचा बाजार मांडणारे मात्र स्वतःला अर्थव्यवस्थेचा कणा म्हणवतात. मग कोट्यावधी जनतेचा पोशिंदा असलेला शेतकरी कोण आहे अशाप्रकारच्या उद्विग्न प्रतिक्रिया सुद्धा शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहेत. १८ आणि १९ व्या शतकात इंग्रजांनी आपल्या देशात गांजा अफीम ची रीतसर शेती केली व त्याचा वापर करून महसूल मिळवला, हे नैतिक दृष्ट्या चुकीचे जरी असले तरी सुद्धा जसे अमिताभ घोष यांनी त्यांच्या ” सी ऑफ पॉपीस” या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे या गांजा व अफीम शेतीमुळे त्याकाळात देशातील जवळ जवळ १ कोटी शेतकरी संपन्न झाले होते. जर दारू ची कोरोनामध्ये सुद्धा सर्रास विक्री करून नैतिकता खराब होत नसेल तर गांजा अफीम शेती करण्याची परवानगी देण्यात सुद्धा सरकारला नैतिकतेचा प्रश्न पडायला नको!