विधानसभा निवडणुकीनंतर भाजप शिवसेना यांच्यातील मुख्यमंत्री पदासाठीची रस्सीखेच अनेक दिवस चालली. शेवटी वाद शिगेला गेले आणि महायुती तुटली. परिणामी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद मिळवलं. यात सर्वात मोठा कर्तब होता ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा. संजय राऊत यांनी अग्रलेख आणि पत्रकार परिषदेतून केलेल्या टिकांनी भाजपला घायाळ केलं. त्या जखमा अजूनही फडणवीसांच्या जिव्हारी लागलेल्या दिसत आहेत.
‘ABP माझा’च्या वार्ताहरांशी बोलतांना देवेंद्र फडणवीसांनी सर्वांवरच निशाणा साधला. ते म्हणाले, “हे तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असल्यामुळे यांच्या गतीला मर्यादा आहेत. या सरकारला जनतेचा मोठा विरोध आहे. परिणामी हे सरकार कितपत टिकेल याची खात्री नाही. मात्र शिवसेनेने साद दिली तर आमचे दार कायम उघडेच आहे, आम्ही साथ देण्यासाठी तयार आहोत. परंतु त्यांनी प्रतिसाद द्यायला हवा,” असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेला पुन्हा एकत्र येण्याचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे खासदार संजय राऊत यांच्यावर मात्र फडणवीस चांगलेच नाराज दिसतात. म्हणून त्यांनी राऊत यांना एक सल्ला दिला आहे. फडणवीस म्हणाले, “राऊत यांच्याशी माझी काही खास मैत्री नाही. पण अधूनमधून भेट होत असते तेवढीच काय ती ओळख. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलतांना किंवा लिहितांना संयम पाळावा.” असा टोला फडणवीसांनी राऊत यांना दिला.