विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय पक्षांसोबतच राज्य निवडणूक आयोगाची देखील जय्यत तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणजे ‘मतदानादरम्यान लागणाऱ्या शाईच्या तीन लाख बाटल्यांची आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना वाटप करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सदर माहिती ट्विटद्वारे पुरवली आहे.
मतदान केल्याचा पुरावा तसेच एका व्यक्तीने एकदाच मतदान करावे यासाठी मतदान केल्यावर मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते जी लगेच सूकते व बरेच दिवस बोटावरून निघत नाही. ही शाई कर्नाटक मधील म्हैसूरच्या ‘म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश’ या कंपनीत बनवली जाते. भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रत्येक निवडणुकीसाठी लागणारी शाई याच कंपनीद्वारे पुरवली जाते. यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये २८८ मतदारसंघांतील ९६,६६१ मतदान केंद्रांसाठी लागणार असलेली शाई याच कंपनीने पुरवली आहे. आजच राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या शाईच्या ३ लाख बाटल्यांचे वितरण करण्यात आले असे मीडिया न्यूज वरून समजले.