
महाराष्ट्रात नुकताच इयत्ता १० वी चा निकाल जाहीर झाला असून पुढे काय करायचे असा प्रश्न १० वी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यातच पुढील शिक्षणाचा एक उत्तम मार्ग असलेल्या आयटीआयची प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्ट २०२० अर्थात उद्यापासून सुरू होणार असे जाहीर केले आहे. लॉकडाऊनमुळे आयटीआयची प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाईन पार पडणार आहे. https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना १ ऑगस्टपासून प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे. तसेच दहावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी वेळेत अर्ज करावा असे आवाहन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असली तरी आयटीआय महाविद्यालये शिक्षणासाठी कधीपासून सुरू होणार याबद्दल अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही. लॉकडाऊन संदर्भात सरकार जे निर्णय देईल त्यानुसार महाविद्यालये सुरू केली जातील असे नवाब मलिक यांनी सांगितले. आयटीआयच्या प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकतात. तसेच वय वर्ष १४ च्या वरील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असून उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश नोंदणी व अर्ज भरणे, आयटीआय सेंटरची निवड करणे, प्रवेश अर्जात दुरुस्ती अशी सर्व कामे ऑनलाईन च करावी लागणार आहेत अशीही माहिती नवाब मलिक यांनी दिली.