
दुसरा लॉक डाऊन (Lockdown2.0) येत्या काही दिवसात म्हणजेच ३ मे रोजी संपुष्टात येईल. जसा २१ दिवसांचा काळ गेला तसाच ३ मे पर्यंतचा दुसरं लॉक डाऊन देखील काहीच दिवसात संपेल. पण मुंबई पुणे जिथं मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या आहे अशा शहरांचं काय होणार आहे? ३ तारखेनंतर सर्व काही जैसे थे होईल असं तुम्हाला वाटत असेल तर हा रिपोर्ट आधी वाचा. कारण मुंबई पुणे MMR रिजनमधील शहरांमधील लॉक डाऊन ३ मे पासून पुढे जून महिन्यापर्यंत सुरूच राहू शकतं.
सध्या तरी मुंबई MMR आणि पुणे MMR भागातील लॉक डाऊन उठवण्याचा कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. जर या भागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतचं राहिली तर या भागांमधील लॉक डाऊन किमान जून पर्यंततरी वाढवायला लागेल, अशी माहिती महाराष्ट्र सरकारमधील अधिकाऱ्यांनी Economic Times या इंग्रजी वेबसाईटला दिली आहे.
उलट वाढत्या कोरोना केसेस पाहता रेड झोनमध्ये आणखी कडक आणि कठीण निर्बंध लादले जाऊ शकतात. परिणामी ट्रेन्स, बसेस याचसोबत दुकानं किमान जूनपर्यंत बंदच राहताना पाहायला मिळतील.
महाराष्ट्र सरकारकडून राज्याची ठप्प असलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न होतोय. अशात मुंबईसारखं शहर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या स्थितीत सरकारकडून राज्याची पूर्णपणे ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातायत यावर देखील अनेकांच्या नजर आहेत.
मुंबईत दिवसागणिक कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढताना पाहायला मिळतेय. कधी तीनशेच्या वर तर कधी चारशेच्या वर, दररोज मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. शुक्रवारपर्यंत मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवारी ४५८९ एवढी होती. नुकतंच केंद्रीय आरोग्य पथक मुंबईतील विविध कन्टेन्टमेन्ट झोनमध्ये फिरून आलं. धारावी सारख्या अत्यन्त दाटीवाटीच्या ठिकाणी कोरोना फोफावू नये यासाठी अधिक जास्त क्वारंटाईन सेंटर्स सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. काही अभ्यासकांच्या मते मुंबईत मे महिन्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळतील असं देखील बोललं जातंय.