Home महाराष्ट्र हिंगणघाटच्या घटनेची पुनरावृत्ती; घरात येण्यास नकार दिल्याने महिलेला मारहाण करून जिवंत जाळण्याचा...

हिंगणघाटच्या घटनेची पुनरावृत्ती; घरात येण्यास नकार दिल्याने महिलेला मारहाण करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

0

हिंगणघाट येथे एका ३० वर्षीय प्राध्यापिकेला रस्त्यावर जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या बातमीने काल सबंध महाराष्ट्र हादरला होता. त्या घटनेच्या स्मृती थोड्याफार कमी होतात न होतात की आज तशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. न्यूज १८ लोकमतच्या रिपोर्टनुसार औरंगाबाद येथे एका ५० वर्षीय महिलेला अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न एका नराधमाने केला. यात पीडित महिला ९५% भाजली असून तिच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार आरोपी गावातील एक बियर बार चालवत असून संतोष मोहिते असे त्याचे नाव आहे. घटनेनंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. महिलेशिवाय घरात कोणीही नाही हे पाहून आरोपी संतोष मोहिते याने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. घरात एकट्या असलेल्या महिलेने त्याला घरात घुसण्यास विरोध केल्याने त्याने महिलेला मारहाण केली व तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. पीडित महिला ९५% भाजली असून तिला अनेक गंभीर दुखापती झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेची प्रकृती अद्याप चिंताजनक असून तिला श्वास घेण्यास त्रास होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी समोर आलेल्या या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांनी राज्यातील वातावरण गंभीर झाले आहे.