
मंगळवारी सिंधुदुर्ग येथील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे नेते व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. पाटील यांच्या मते, “मुंबई हे शिवसेनेचे नाक होते; मात्र तिथेच भाजपने शिवसेनेला नामोहरम केले आहे.” पुढे ते म्हणाले, “आता पुढचे लक्ष्य आहे कोकण व याची सुरुवात सिंधुदुर्गमधून झालीच आहे. म्हणूनच आता कोकणातही भाजपला घवघवीत यश मिळणार.” त्याचबरोबर “सावंतवाडी येथील नगराध्यक्ष निवडून आणून भाजपने बाजी मारली व शिवसेनेचे नाक कापले आहे” असंही ते म्हणाले.
एक वेळ होती जेव्हा भाजप व शिवसेना एकत्रित निवडणूक लढत होते. मात्र सद्यस्थिती अशी आहे की दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. चंद्रकांत पाटील एवढ्यात गप्प झाले नसून पुढे म्हणाले, “राज्यातील सहा जिल्हा परिषदेच्या निकालाच्या वेळी भाजप महाविकास आघाडीला पुरुन उरेल, महाआघाडीचे हे सरकार पाडण्यासाठी भाजप काहीही प्रयत्न करणार नाही.” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.