
आज थर्टी फर्स्टनिमित्त जगभरात लोक आनंद साजरा करतील तर दुसरीकडे मुंबईत 40 हजाराहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर बंदोबस्ताला तैनात राहतील. सामनाच्या एका रिपोर्टनुसार शिवाय सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बी.डी.डी.एस, विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक पोलीस, होमगार्ड असा एकत्रित मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गर्दीची ठिकाणं सीसीटीव्हीच्या निदर्शनात तर राहतीलच पण सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस देखील उपस्थित राहतील. महत्त्वाच्या ठिकाणांवर नाकाबंदी राहणार आहे. महत्वाचं म्हणजे ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह व रश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.
पोलीसांनी सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक वापरण्याची मुभा दिली आहे. ही परवानगी केवळ बंदिस्त जागेत सेलिब्रेशन करण्यासाठी देण्यात आली असून रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकणी कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कुठलीही अडचण असल्यास 100 नंबर वर किंवा 7738133133/7738144144 डायल करून मदत घ्यावी असे आदेश मुंबईकरांना मुंबई पोलिसांनी दिले आहेत.