
प्राईम नेटवर्क: आपल्या येथील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते तेच कळतं नाही, आणि आता तर म्हणे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुंबई पालिका या वर्षीही ‘कोल्ड मिक्स’चा वापर करणार आहे. यासाठी 15.86 कोटींचा खर्च केला जाणार आहे. भरपावसात खड्डे बुजवण्यासाठी ‘कोल्ड मिक्स’ वापरण्यात येणार आहे.
पालिकेने गेल्या पावसाळय़ापूर्वी,पावसाळय़ात व पावसानंतर रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी ‘कोल्ड मिक्स’ मटेरियलचा तर काही ठिकाणी हॉट मिक्सचा वापर करण्यात आला होता. या वर्षीही भरपावसात खड्डे बुजवता येणारे कोल्ड मिक्स पुन्हा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात 15.86 कोटींची तरतूद केली आहे. मागील पावसाळय़ात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी वरळी प्लांटमध्ये एक हजार मेट्रिक टन इतके कोल्ड मिक्सचे उत्पादन केले होते. तसेच त्यापूर्वी पालिकेने खड्डे बुजविण्यासाठी दहा हजार मेट्रिक टन इतक्या हॉट मिक्स मटेरियलचा वापर केला होता. त्या तुलनेत पालिकेने गेल्या वर्षी उत्पादन केलेल्या एक हजार मेट्रिक टन कोल्ड मिक्स मटेरियलपैकी 800 मेट्रिक टन इतक्याच कोल्ड मिक्सचा वापर करण्यात आला होता.
याआधी परदेशातून आणण्यात येणार्या एक किलो कोल्ड मिक्ससाठी 170 रुपयांचा खर्च येत होता, मात्र आता पालिकेने वरळी येथील डांबर प्लांटमध्ये याच कोल्ड मिक्स मटेरियलचे उत्पादन सुरू केल्याने ते पालिकेला प्रति किलो 27 रुपये इतक्या स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यंदाही याच कोल्ड मिक्स मटेरियलचे उत्पादन वरळी येथील डांबर प्लांटमध्ये करण्यात येणार असून त्याचाच वापर खड्डे बुजविण्यासाठी करण्यात येणार आहे.आता यंदा तरी;निदान या पावसाळ्यात तरी खड्यांपासून कमी त्रास होतो का पाहूया ?