प्राईम नेटवर्क :“पनीर टिक्का मसाला” “पालक पनीर” “पनीर कोफ्ता” आहाहा ! तोंडाला पाणी सुटलं ना? पण ही बातमी वाचून मात्र तुमच्या तोंडचे पाणी पळेल.
वसई तालुक्यात अनेक ठिकाणी आरोग्यास घातक बनावट पनीर आणि बटर तयार केले जाते, त्याची परिसरातील हॉटेल, ढाबे, रिसॉर्ट येथे विक्री केली जाते, अशा तक्रारी पालघर जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी गुन्हे प्रतिबंध पथकास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वसई-विरार परिसरातील आणखीन एका कारखान्यावर पालघर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत २ हजार किलोचे बनावट पनीर जप्त केले आहे.तसेच, पनीर तयार करण्याचे साहित्य, अॅसेटिक अॅसिड, ग्लिसरॉल, पावडर आदी वस्तू मिळून आल्या. गेल्या काही दिवसांपासून पालघर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे वसईत धाडसत्र सुरु असून, मागील तीन दिवसात ही तिसरी कारवाई करून २ हजार किलोचे बनावट पनीर जप्त केले आहे.
वसईतल्या २ कारखान्यांवर छापे टाकून हे बनावट पनीर जप्त करण्यात आले. यामुळे शहरात भेसळयुक्त पनीर बाजारात विकला जात असल्याचा प्रकार पुन्हा उघड झाला आहे. कारखानदारांच्या भेसळयुक्त पदार्थाच्या विक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अन्न भेसळ प्रतिबंधक अधिकारी याबाबत आणखीन तपास करत आहेत.