
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन हे ३ मे पर्यंत वाढवत असल्याचे जाहीर केल्यानंतर काल दुपारी वांद्रे स्थानकावर परप्रांतियांच मजुरांची अक्षरशः गर्दी जमली. इथे जमलेल्या प्रत्येकाला आपआपल्या गावी जायचे होते. अचानक एवढी गर्दी कशी जमली ? याबद्दल राज्य सरकार तसेच पोलीस यंत्रणेसमोर असंख्य प्रश्न उभे राहीले. दरम्यान पोलिसांनी याचा पूर्ण तपास केला असता ते उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष विनय दुबे याच्यापर्यंत पोहोचले. जमावाला भडकवल्याप्रकरणी दुबे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
वांद्रे येथे गर्दी जमावल्याप्रकरणी विनय दुबेला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याने फेसबुक वर लाईव्ह करत उत्तर भारतीयांसाठी मजदूर आंदोलनाची हाक दिली होती.
परप्रांतीयांना आपण आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी पायी जाणार असल्याचे त्याने म्हटले होते. यासाठी प्रत्येकाची माहिती व्हॉट्सएप नंबरवर पाठवण्याचे आवाहन देखील त्याने केले होते.
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आंदोलनाची जाहीर केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी विनय दुबेला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.
१५ एप्रिलला लॉकडाऊन शिथिल होईल आणि रात्री १२ नंतर आपल्याला आपल्या राज्यात परतता येईल अशी आशा या कामगारांच्या मनामध्ये होती. एकंदर पाहता वांद्रे परिसरात अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. हे सर्व कामगार या कंपन्यांमध्ये रोजंदारीवर कामे करतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्या राहण्याचे आणि खाण्याचे अत्यंत हाल होत आहेत. यातील काही कामगार काम करत असलेल्या ठिकाणीच राहत आहेत.
शिवाय, एकाच घरात १३ ते १४ लोक राहत असल्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा अक्षरशः तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे. अशात कोरोना या धोकादायक विषाणूचा याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे हातावर पोट असलेल्या या कामगारांनी आपल्या राज्यात जाण्याचा पर्याय निवडला आहे.
दरम्यान आज लॉकडाऊन संपेल आणि किमान लांब पल्ल्याच्या गाड्या तरी सुरू होतील आणि आपल्याला गावी परतता येईल अशी आशा प्रत्येक कामगाराच्या मनात होती. पण अचानक लॉकडाऊन वाढल्यामुळे अनेकांची निराशा झाली. लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक सेवा बंद आहे, शिवाय राज्यांच्या सीमा देखील सील करण्यात आल्या आहेत. अशा सर्व परिस्थितीत कामगारांची अचानक जमलेली गर्दी प्रश्न निर्माण करत आहे!