
एकीकडे नागपुरात हिवाळी अधिवेशन चालू आहे तर दुसरीकडे नागपुरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मध्यरात्री अज्ञात हेल्मेटधाऱ्यांनी आउटर रिंगरोड येथे बेभान गोळीबार केला. त्यामुळे नागपूर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहेत. सुदैवाने संदीप जोशी यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नसून त्यांनी या बाबत पोलिसात तक्रार दिली आहे. यापूर्वी नागरिकांच्या समस्या कळाव्यात म्हणून संदीप जोशी यांनी शहरात १०० तक्रार पेट्या बसवल्या होत्या. दरम्यान एक दिवस एका तक्रार पेटीत त्यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. याची देखील त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती.
मीडिया रिपोर्टनुसार संदीप जोशी यांनी काल लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वर्धा रोडवरील रसरंजन धाब्यावर सेलिब्रेशन आयोजित केलं होतं. मेजवानी आवरल्यावर संदीप जोशी कुटुंबासह घरी निघाले. त्यांच्या सोबत मित्र आणि नातेवाईकांच्या देखील सात गाड्या होत्या. संदीप जोशी आपली फॉर्च्युन स्वतःच चालवत होते. त्यांची गाडी सर्वात मागे होती. राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळ येताच अचानक अज्ञान हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. एका मागोमाग आरोपीने चार गोळ्या चालवल्या, गोळीबार कट्याने केला असून काचा फोडून गोळ्या आत आल्या मात्र सुदैवाने संदीप जोशी व त्यांच्या कुटुंबियांना कुठलीही इजा झाली नाही.