Home महाराष्ट्र ‘नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही’; राणे बंधूंच्या मतभेदाबद्दलच्या मीडिया न्यूजला निलेश...

‘नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही’; राणे बंधूंच्या मतभेदाबद्दलच्या मीडिया न्यूजला निलेश राणेंचे उत्तर

0

निवडणुकीच्या काळात कुटुंबातील अंतर्गत वादविवाद काही नवीन नाही. विधानसभा निवडणुका केवळ एका आठवड्यावर असतांना अशा बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. त्यातीलच एक म्हणजे नारायण राणेंच्या दोन्ही पुत्रांमधील मतभेद कालपासून चर्चेचा विषय बनला होता. परंतु निलेश राणे यांनी आज ट्विट करून त्यावर स्पष्टीकरण दिले असल्याने या चर्चा तात्पुरत्या तरी थांबल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे धाकटे पुत्र नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी ‘आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करायचंय’ असं वक्तव्य केलं होतं. यावर निलेश राणे यांनी काल १३ ऑक्टोबरला ट्विट करून असहमती दर्शवली होती. भाजपने यावेळी नारायण राणेंना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने युती असतांनाही तिथे त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला. असे झाले असले तरीही नितेश राणेंनी शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिला.

त्यामुळे त्यांचे थोरले बंधू निलेश राणे यांनी ‘नितेशच्या या विषयाशी मी जराही सहमत नाही’ असे आपल्या ट्विटमध्ये सांगितले होते. या गोष्टीचा मीडियाने चुकीचा अर्थ घेतला व ‘भावांभावांतील वाद उघड’ अशा हेडलाईन्सखाली बातम्या प्रसिद्ध केल्याचे समजल्याने निलेश राणेंनी आज पुन्हा ट्विट करून ‘कालच्या माझ्या ट्विटचा मीडियाने गैर अर्थ काढला असून नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही’ असे स्पष्ट केले. त्यामुळे कालपासून चालू झालेल्या चर्चेला तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.