
कोरोनाचं संकट गहिरं झाल्याने राज्य सरकारने मोठे आर्थिक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार राज्यात कुठल्याही प्रकारची नवी नोकरभरती होणार नाही. तसंच यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली सुद्धा करण्यात येणार नाही. इतकंच नाही तर सध्या सुरु असलेली सर्व कामं स्थगित करण्याचे आदेश अर्थखात्याने दिले आहेत. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अजित पवार यांच्या अर्थखात्याने कडक पावलं उचलली आहे.
आरोग्याशी सोडून कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय शक्य तिथे आर्थिक तडजोड करुन, काटकसर करण्याच्या सूचना अर्थ विभागाने दिल्या आहेत.
त्याचा सर्वात मोठा फटका नव्या नोकरभरतीला बसणार आहे. कारण देवेंद्र फडणवीसांच्या काळात रखडलेली ७२ हजार जागांची भरती करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र कोरोना संकटामुळे ही भरती रखडली आहे. कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेश अर्थविभागाने दिले आहेत.

सदर घोषणेनंतर स्पर्धा परीक्षा करत असणाऱ्या विद्यार्थाना प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे. मागील वर्षी झालेल्या परीक्षांचे निकाल अद्याप लागले नसून त्यात आता या वर्षी परीक्षाच नाहीत अशी द्वंद्व परिस्तिथी असताना विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लटकले आहे.