Home महाराष्ट्र “या” मतदारसंघात मतदारांनी टाकला मतदानावर बहिष्कार; केवळ एका मतदाराने केले मतदान; जाणून...

“या” मतदारसंघात मतदारांनी टाकला मतदानावर बहिष्कार; केवळ एका मतदाराने केले मतदान; जाणून घ्या कारण…

0

विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्यभरात  सर्वांना निकालाचे वेध लागले आहेत. आपण लहानपणी पासून शिकत आलो आहोत की भारतीय नागरिकाला संविधानाने मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र आजही कुठल्याच मतदार संघात पूर्ण मतदान होत नाही. उलट दिवसेंदिवस ही टक्केवारी घटत चालली आहे आणि महाराष्ट्रात आता एक नवीनच अचंबित करणार प्रकार समोर आला आहे.

मीडिया न्यूजनुसार महाराष्ट्राच्या विधानसभा मतदार संघातील पहिला मतदार संघ असलेल्या अक्कलकुवा येथील मणीबेली गावात फक्त एकाच मतदाराने मतदान केले. याचे कारण म्हणजे या गावातील सर्व मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. भारत सर्व क्षेत्रांमध्ये इतकी प्रगती करत असतांना या गावात अजूनही वीज, पाणी, रस्ते या सामान्य गोष्टीदेखील अडचणींचा विषय आहेत. याशिवाय गेल्या काही दिवसांपूर्वी गावालगत असलेल्या सरदार सरोवरात पाणी सोडल्यानंतर ते पाणी गावात येऊन काही घरे पाण्याखाली गेली होती. परंतु अद्यापही या घरांचे पुनर्वसन झालेले नाही. या सर्व अडचणींकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने या गावातील मतदारांनी सामूहिकरीत्या मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता.

हे गाव नंदुरबार जिल्ह्यातील असून गावाची लोकसंख्या एकूण १३०० इतकी आहे तर त्यातील ३२८ नोंदणीकृत मतदार आहेत. परंतु या सर्व मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला असल्याने दुपारपर्यंत कोणीही मतदान करायला गेले नाही. त्यामुळे मतदान अधिकाऱ्यांनी गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तरीही केवळ एकच मतदार मतदानासाठी गेला असे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार समजले. सहदेव दळवी असे या मतदाराचे नाव असून मणीबेली गावातील मतदान करणारा हा एकमेव मतदार ठरला आहे.