
राज्यात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना आता आपल्या गावी जाण्यासाठी प्रवासाची मुभा मिळणार आहे. केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर आता राज्य सरकारनेही नियमावली जारी केली आहे. त्यामुळे अडकून पडलेल्या लोकांना आता घरी जाता येणार असलं तरी कडक नियमावलीमुळे प्रवासाची परवानगी मिळवणं डोकेदुखी ठरणार आहे. याबाबतची बातमी zee २४ तास ने वृत्त दिले आहे.
राज्यात विविध ठिकाणी मजूर, विद्यार्थी, देवदर्शनाला गेलेले भाविक किंवा अचानक लॉकडाऊन झाल्याने एखाद्या ठिकाणी अडकून पडलेले लोक यांना आता त्यांच्या घरी जाता यावे म्हणून प्रवासासाठी मुभा दिली जाणार आहे. यात राज्याबाहेरून येणाऱ्या आणि राज्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांनाही प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. मात्र या परवानगीमुळे गर्दी होऊ नये किंवा कोरोना पसरण्यास मदत होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी तीन वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची यात समन्वयक म्हणून महत्वाची जबाबदारी राहणार असून प्रत्येक जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यातून जाणाऱ्या लोकांची यादी बनवणार आहे आणि ती हे लोक ज्या जिल्ह्यात जाणार आहेत त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे पाठवणार आहेत.
विविध राज्यांत जाणाऱ्या लोकांची यादी बनवून त्यांच्या प्रवासाचा तपशील, तारीख आदी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावी लागणार आहे. जिल्हाधिकारी किंवा राज्य सरकारच्या अधिकृत यंत्रणेकडून पत्र मिळाल्याशिवाय कोणालाही अजिबात प्रवास करता येणार नाही. तसेच ज्या जिल्ह्यात व्यक्ती जाणार असेल त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची अधिकृत परवानगीही मिळवावी लागणार आहे. अशी परवानगी नसेल तर प्रवास करता येणार नाही.
जी व्यक्ती प्रवास करणार आहे, त्या व्यक्तिचे स्क्रीनिंगसुद्धा करण्यात येणार आहे. ज्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतील अशा लोकांनाच प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे. प्रवास करण्यासाठी स्वतःचं वाहन वापरण्याची परवानगी दिली जाणार आहे. पण ज्या जिल्ह्यात जाणार आहे त्या जिल्ह्यातूनही परवानगी मिळवण्याची आवश्यकता आहे. प्रवास करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावे पास दिला जाणार आहे. त्यात त्याचा प्रवासाचा मार्ग, प्रवासाची तारीख लिहिलेली असेल. ज्या वाहनातून प्रवास करणार त्या वाहनाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल.
महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांना आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार. प्रवास करून आलेल्या व्यक्तिची माहिती वरचेवर स्थानिक आरोग्य विभागाकडून घेण्यात येणार आहे. संबंधित व्यक्तिला घरात क्वारंटाईन करायचे की संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवायचे याबाबत स्थानिक आरोग्य विभाग निर्णय घेणार आहे.