
प्राईम नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी महाराष्ट्राच्या दौर्यावर येत असून त्यांच्या हस्ते विदर्भ आणि खानदेशत विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे.
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभुमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धुळे जिल्हा दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर आज (दि.१६) दुपारी १ वाजता नियोजित कार्यक्रमानुसार धुळ्याला येतील. तर, यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी पांढरकवडा येथे बचतगटाच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत.
जिल्ह्यात महिला बचतगटाचे मोठे जाळे असून 17 हजार पेक्षा जास्त बचत गट चांगले कार्य करत आहेत. या सर्व महिलांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पांढरकवडा येथे १०.३० वाजता येणार आहेत.या वेळी राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित असतील.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे पंतप्रधानांच्या हस्ते एकलव्य मॉडेल स्कूलचे उद्घाटन होणार आहे. तसेच प्रधानमंत्री गृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात येतील. अजनी (नागपूर) ते पुणे रेल्वेचा ई-शुभारंभ, ग्रामोन्नती योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप होणार आहे. त्यानंतर ते धुळ्याकडे रवाना होतील. लोअर पांझरा मध्यम प्रकल्पाचे उद्घाटन, सुळवडे-जांफळ उपसा सिंचन योजना, धुळे शहराच्या पाणीपुरवठा योजना, धुळे-नारदा रेल्वे व जळगाव-मनमाड या रेल्वेवरील तिसर्या लाईनचे भूमीपूजन होणार आहे.
धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गोशाळेच्या मैदानावर ही सभा होणार आहे. दुपारी २ वाजता मोदींचे आगमन होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींची खान्देशात ही पहिलीच सभा असणार आहे.