कोरोनाच्या काळात समाजातील सर्वच घटकांना नुकसानीचा मारा सहन करावा लागला आहे. या कालावधीत वेश्याव्यवसाय जवळपास बंदच झाला असल्याने हा व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया व त्यांची कुटुंबं मोठ्या आर्थिक विवंचनेत आहेत. या बाबीचा विचार करून राज्य महिला व बाल विकास मंत्रालयाने वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांसाठी मुख्यमंत्री साहाय्य निधीतून आर्थिक मदत जाहीर केली आहे.
याबाबत राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत दरमहा ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच ज्या स्त्रियांची मुले शाळेत आहेत त्यांना अतिरिक्त २५०० रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या महिला व बालबिकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणेला निर्देश दिले आहेत.