जगभरात कोरोना संसर्गाचं थैमान सुरु आहे आणि याच्या थेट झळा भारताला सुद्धा बसत आहेत, देशभरात ४० हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. आता महाराष्ट्रातही कोरोनाने शिरकाव केला असून राज्यातील पहिला रुग्ण पुण्यात आढळला आहे. पुण्यात कोरोनाचे २ रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित रुग्ण हे नुकतेच दुबईला जाऊन आले असल्याची माहिती मिळत आहे.
यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारले असता ते म्हणाले, “मी आजच महाराष्ट्रात एकही कोरोना रुग्ण नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, माझ्या मुलाखतीनंतर तासाभरातच मला पुण्यातील कोरोना रुग्णांची माहिती मिळाली. हे दोन रुग्ण पती-पत्नी आहेत. ते वीणा ट्रॅव्हल्सने १ मार्चला दुबईवरुन आले होते. आज ६ मार्चपर्यंत त्यांना कोणतेही लक्षणं दिसली नाहीत. मात्र, पत्नीला कोरोनाची लक्षणं जाणवायला लागले. म्हणून त्यांनी तपासणी केली. दोघांचीही रक्त तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटीव्ह निघाले. यानंतर तातडीने त्यांना विलगीकरण कक्षात उपचार सुरु केले आहेत.”
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुण्यातील आयटी कंपन्या विशेष खबरदारी घेत आहेत. पुण्यातील अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरुन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.