
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर एक खोचक वक्तव्य केलं आहे. “भाजप सोबत एकत्र येऊन मनसेचा कुठलाही फायदा होणार नाही म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे” असा सल्ला आठवले यांनी दिला. आज मनसेचे महाअधिवेशन होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बोलतांना आठवले यांनी हे वक्तव्य केलं.
लोकसत्ताच्या रिपोर्ट नुसार रामदास आठवले यांनी बुधवारी अर्थात काल नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शासकीय योजनांचा आढावा घेत योजनांच्या अंमलबजावणीविषयी समाधान व्यक्त केले. दरम्यान पत्रकारांशी बोलतांना त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी मुंबईतील ‘चोवीस तास’ संकल्पनेलाही विरोध केला व या संस्कृतीमुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात येईल असे मत व्यक्त केले.