
भाजप शिवसेना महायुतीने विधानसभेत बाजी मारली खरी पण आता सत्तास्थापनेचा काही मुहूर्त लागत नाहीये. दोन्ही पक्षातला तिढा सुटण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. अशात राजकीय वर्तुळात अनेक निरनिराळ्या चर्चा चालू आहेत. दरम्यान सोमवारी रात्री मातोश्री बंगल्याबाहेर आदित्य ठाकरे यांचं कौतुकास्पद बॅनर लावलं आहे. परिणामी अजूनच चर्चेला उधाण आले आहे.
या बॅनर मध्ये लिहिले आहे, “साहेब आपण करून दाखवलंत” व आदित्य ठाकरेंना संबोधून ‘माझा आमदार माझा मुख्यमंत्री’ असंही म्हटलं आहे. एकीकडे सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसताना अशा बॅनरमुळे चर्चेला उधाण आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आपल्या मागण्या भाजपसमोर ठेवत आहे. मात्र भाजप शिवसेनेचा काही ठाव लागू देत नाही. त्यामुळे पुढील काही दिवस नक्की काय घडणार याकडे सर्वांचे विशेष लक्ष आहे.
देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांची भेट घेतली तर दुसरीकडे शरद पवारांनी सोनिया गांधींची आणि आज राज ठाकरेंनी शरद पवारांना भेट दिली. या सर्व राजकीय हालचाली पाहता पुढील काही दिवसात काय घडणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे.