
देशाबरोबरच हळूहळू महाराष्ट्रातीलही सर्व गोष्टी अनलॉक होत आहेत. अद्याप बंद असलेले शाळा महाविद्यालये देखील लवकरच सुरू होणार असल्याची चिन्ह आहेत. ऑनलाईन माध्यमातून शिक्षण जरी सध्या सुरू असले तरी शाळा प्रत्यक्षात कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वांच्या मनात होताच. याबाबत महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
येत्या 23 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील शाळा सुरू होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना सक्ती केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले. याबाबतची नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे. तसेच या शैक्षणिक सत्रातील १०वी व १२वीच्या परीक्षा मे महिन्यात होतील असेदेखील शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.