Home महाराष्ट्र १ जुलै पासून नववी ते बारावीच्या शाळा उघडणार? शालेय शिक्षण विभागाची कुठलीही...

१ जुलै पासून नववी ते बारावीच्या शाळा उघडणार? शालेय शिक्षण विभागाची कुठलीही अधिकृत घोषणा नाही

0

राज्यातील शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात येऊ नयेत यासाठी कडाडून विरोध सुरू असताना काही प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की नववी ते बारावीच्या शाळा ह्या १ जुलै पासून कमीत कमी तीन तासांसाठी सुरू करण्यात येतील.

प्रसारमाध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंबंधी एक वेळापत्रक बनवले असून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या वेळापत्रकानुसार पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरमध्ये, तर सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टमध्ये सुरू होतील. दहावीच्या निकालानंतर अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा विचार करून घरी राहूनच डिजिटल पद्धतीने अभ्यास निश्चित वेळेत केला जावा, असे या प्रस्तावात म्हटले आहे.

काही प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की शाळेभोवतीच्या कोरोना परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून मगच त्या त्या शाळांबाबत नियम ठरवले जातील. शाळा सुरू होण्याच्या दहा दिवस आधीपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण त्या शाळेच्या आवारात वा त्या गावामध्ये नसायला हवा अशी अट शिक्षणविभाग घालून देणार असल्याचे कळते आहे. ऑनलाईन शिक्षणाचा लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता शिक्षण विभागाने इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून वगळले आहे. तसेच तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दररोज कमाल एक तास, सहावी ते आठवी कमाल दोन तास आणि नववी ते बारावीसाठी कमाल तीन तास वर्ग घेण्यात यावे. या वर्गादरम्यान विद्यार्थ्याना सुट्टी देण्यात येणार आहे.

शाळा सुरू होण्याच्या संभाव्य तारखा खालीलप्रमाणे

नववी, दहावी, बारावी जुलै २०२० पासून

सहावी ते आठवी ऑगस्ट २०२० पासून

पहिली ते पाचवी सप्टेंबर २०२० पासून

अकरावी दहावीच्या निकालावर आधारित अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर