
रोखठोक पत्रकार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार मुकुंद कर्णिक अर्थात भैय्या यांना आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने देवाज्ञा झाली. आज रात्री ८.३० वाजता त्यांचा अंत्यविधी पार पडला.
जवळपास साठीच्या वर असणारे मुकुंदजी गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. १९९६ पासून ते क्रीडा पत्रकार म्हणून काम करू लागले. त्यानंतरची १५ वर्षे त्यांनी ‘आपलं महानगर’ या वर्तमानपत्रासाठी क्रीडा क्षेत्राचे लिखाण केले. तसेच काही काळ दैनिक लोकमतसाठी देखील त्यांनी क्रीडा विभागाचे काम पाहिले. क्रिकेटवर त्यांचे विशेष प्रेम होते. अनेक रणजी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे त्यांनी अख्ख्या भारतात वार्तांकन केले. त्यामुळे बऱ्याच क्रिकेटपटूंना ते जवळून ओळखायचे. २००६ साली जेव्हा मराठी क्रीडा पत्रकार संघाचे सचिन तेंडुलकरचा सुवर्ण बॅट देऊन सत्कार केला होता तेव्हा कर्णिक यांनी अध्यक्षपद भूषवले होते. अशा या स्पष्टवक्त्या आणि रोखठोक व्यक्तिमत्त्वाच्या निधनामुळे भारताने एक उत्कृष्ट पत्रकार गमावला.