
यंदाच्या विधानसभा निवडणुका २१ ऑक्टोबरला होणार असून २४ ऑक्टोबरला निकाल लागेल असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुका शांततेत व सुरळीतपणे पार पडाव्यात म्हणून महाराष्ट्र निवडणूक आयोग यंत्रणा प्रस्थापित करत आहे.
महाराष्ट्रात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ असून या सर्व मतदारसंघात जवळपास साडेसहा लाख अधिकारी कार्यान्वित असणार आहेत. तसेच संपूर्ण प्रक्रियेच्या बंदोबस्तासाठी पोलीस दलाची सुरक्षा व्यवस्था स्थापित केली आहे. नवीन मतदारांना मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी ४ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांनाही मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात येणार आहेत. तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. या विधानसभा निवडणुकांसाठी ८५० कोटींच्या खर्चाची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे असे निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी सांगितले.