
येत्या सोमवारपासून अर्थात २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तरीही मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. आपल्या भागातील शाळा सुरु करायच्या की नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासनाला घेण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या व संभाव्य धोक्यांचा विचार करून स्थानिक प्रशासनाने शाळा चालू करायच्या की बंदच ठेवायच्या हे ठरवायचे आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून सांगितले की प्रत्यक्ष वर्गांसोबतच ऑनलाईन शिक्षणदेखील सुरूच राहणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन व विद्यार्थ्यांचे आरोग्य, शैक्षणिक हित जपूनच स्थानिक प्रशासनाने शाळा सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा. यानुसार राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या मुंबईसारख्या शहरांमधील शाळा पुढील काही दिवस बंदच ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनांनी घेतला आहे.