Home महाराष्ट्र एका शेतकऱ्यामुळे वाचले हजारो प्रवाशांचे प्राण!

एका शेतकऱ्यामुळे वाचले हजारो प्रवाशांचे प्राण!

0

हुतात्मा एक्स्प्रेसमधील हजारो प्रवाशांचा काळ आला होता मात्र वेळ नव्हती आली. एक धाडशी शेतकऱ्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. झाले असे की रविवारी सकाळी अहमदनगर तालुक्यातील देहरे शिवारात एका ठिकाणी रेल्वे रूळ तुटलेला आहे हे रामदास बापूराव थोरात नामक एका शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी चतुराईने प्रसंगावधान दाखवत रेल्वेला लाल कापड दाखवून गाडी थांबवली आणि मोठी दुर्घटना टळली.

थोरात म्हणाले, “रविवारी सकाळी नऊ वाजता भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस देहरे-विळद परिसरातून जात होती. त्याच वेळी मी शेतात पाणी देण्यासाठी जात होतो. दरम्यान मला रेल्वेचा रूळ तुटल्याचे निदर्शनास आले. त्याच वेळी समोरून येणारी रेल्वे दिसली. शेवटी अंगातील लाल रंगाचे बनियन काढून गाडीच्या दिशेने फडकवत मी धोक्याचा इशारा दिला आणि गाडी थांबवली.” गाडी थांबल्यानंतर थोरात यांनी पुढे रेल्वेचा रूळ तुटलेला आहे हे दाखवून दिले. या गोष्टीची चालकाने व इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी खात्री करून घेतली आणि त्वरित रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती कळवली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी काही वेळात येऊन रेल्वे रूळ तात्पुरता दुरुस्त केला व गाडी मार्गी लावली. थोरातांमुळे मोठा अनर्थ टळला. रामदास बापूराव थोरात यांच्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत व अहमदनगर शिवारात त्यांचं खूप कौतुकही केलं जात  आहे.