
दोन दिवसांपूर्वी चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेली मुलगी उत्तर प्रदेशात सापडली आहे. याप्रकरणी नवी मुंबईचे रहिवासी डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप नोंदविण्यात आला होता. मात्र या प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलेलं दिसत आहे. मागील पंधरा दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर ड्रायव्हर असणारे दिनकर साबळे आणि निशिकांत मोरे यांचे पंधरा वर्षापासून जवळचे संबंध. साबळे या आधी कॉन्स्टेबल होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे ड्रायव्हरचं काम चालू केलं होतं. या ड्रायव्हर दिनकर साबळे यांनी मुख्यमंत्र्यांचा ड्रायव्हर आहे अशी भीती दाखवून पीडित मुलीच्या वडिलांना कोर्टात धमकावल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमतच्या रिपोर्टनुसार यासंदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की पनवेल कोर्टात दुपारी निशिकांत मोरे यांच्या अटकपूर्व जामीनाची सुनावणी चालू असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ड्रायव्हर दिनकर साबळे यांनी पीडित मुलीच्या वडिलांजवळ जाऊन “शांत रहने का, उद्धव ठाकरे का ड्रायव्हर हूँ” अशी धमकी दिली. या धमकीनंतर पीडित महिलेच्या कुटुंबियांकडून रीतसर तक्रार दाखल केली गेली असून ड्रायव्हर साबळे यांना निलंबित करण्यात आले आहे व पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.