Home महाराष्ट्र अनपेक्षित कलाटणी: फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची!

अनपेक्षित कलाटणी: फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची!

0

राज्याच्या राजकारणाने रातोरात एक अनपेक्षित कलाटणी घेतली आहे. आज अर्थात शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी  मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार आज राजभवनात हा शपथविधी पार पडला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या दोघांना शपथ दिली आहे.

हाती आलेल्या माहिती नुसार काल रात्री काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बैठकीत काही मतभेद झाले होते. पुढे मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे राज्यपालांना भेटण्यासाठी गेले. रात्री सुमारे एक वाजता राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस केली आणि सकाळी राष्ट्रपती राजवट हटवून सात वाजताचा शपथविधीचा मुहूर्त ठरला.

दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे मी आभार मानतो की त्यांनी परत एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली आहे. मायबाप जनतेच्या जनादेशाला नाकारून शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. लवकरच आम्ही आता विधीमंडळात बहुमत सिद्ध करणार आहोत.”

अशीही माहिती मिळत आहे की हा अजित पवार यांचा वैयक्तीक निर्णय असून शरद पवार यापासून अनभिज्ञ होते. आता जनतेचे लक्ष याकडे असेल की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बहुमत सिद्ध करू शकतील का…