
उद्या राज्यात होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील मतदारांकडून मतदानावर बहिष्कार टाकण्यात येत आहे. मुंबईतील अनेक वादग्रस्त प्रश्न अजूनही टांगणीला असल्याने अनेक, संघटना, संस्था, सोसायट्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे मतदानाच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती निवडणूक आयोगाला वाटत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग, स्थानिक प्रशासन तसेच विविध पक्षांचे उमेदवार या सर्वांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अनेक वादग्रस्त गोष्टी घडत आहेत. आरेतील वृक्षतोड, मेट्रो कारशेड, पीएमसी बँकेवरील निर्बंध, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या या सर्व कारणांमुळे अनेक नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे असे मीडिया न्यूजवरून समजले. ‘बँका बंद असल्याने आम्हाला मतदान केंद्रावर जाण्यासाठी पैसे नाहीत’ असे सांगून ठाण्यातील पीएमसी खातेदारांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यात पीएमसी बँकेचे जवळपास १८ हजार खातेदार आहेत. त्यामुळे या भागातील मतदानाला मोठा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय वरळीत एसआरए प्रकल्पातील भ्रष्टाचारावर कारवाई होत नसल्याने ‘धोबीघाट घर बचाओ समिती’ने बहिष्कार पुकारला आहे. कल्याणमध्येही एका परिसरातील विकासकाम टांगणीला ठेवल्याने तेथील राहिवाश्यांनी ‘मत मागू नका’ असे लिहिलेला बॅनर लावला आहे.

राज्यभरात उद्या २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र एक दिवस अगोदर हजारो मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने निवडणूक आयोग तसेच उमेदवारांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
