Home महाराष्ट्र आज राज्यभरात होणार मतदान; जाणून घ्या विधानसभा निवडणुकीचा थोडक्यात आढावा

आज राज्यभरात होणार मतदान; जाणून घ्या विधानसभा निवडणुकीचा थोडक्यात आढावा

0

जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. अखेरीस आज अर्थात २१ ऑक्टोबरला राज्यभरात विधानसभा निवडणुका होणार असून निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा आढावा प्रसिद्ध केला आहे; तसेच सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही केले आहे.

राज्यात एकूण २८८ मतदारसंघांतून ३ हजार दोनशे सदोतीस उमेदवार ही निवडणूक लढवणार आहेत. या उमेदवारांमध्ये ३००१ पुरुष, २३५ महिला आहेत. याशिवाय महाराष्ट्रात पहिल्यांदाच एक तृतीयपंथी देखील निवडणूक लढवणार आहे. उमेदवारांच्या संख्येनुसार नांदेड हा ३८ उमेदवार असलेला सर्वात मोठा मतदारसंघ तर चिपळूण हा ३ उमेदवार असलेला सर्वात लहान मतदारसंघ आहे.

राज्यभरात एकूण ९६,६६१ मतदान केंद्रावर मतदान होणार असून ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० इतके मतदार आहेत. मतदारांच्या संख्येनुसार पनवेल हा ५ लाख ५४ हजार ८२७ मतदार असलेला सर्वात मोठा तर वर्धा हा २ लाख ७७ हजार ९८० मतदार असलेला सर्वात लहान मतदारसंघ आहे. २०१९च्या मोजणीनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या १२ कोटींच्या आसपास असून त्यातील जवळपास ९ कोटी मतदार मतदानास पात्र आहेत.

उमेदवारांची पक्षनिहाय संख्या पुढीलप्रमाणे:
◆ भारतीय जनता पक्ष: १५२
◆ शिवसेना: १२४
◆ महायुती इतर मित्र पक्ष: १२
◆ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: १४५
◆ राष्ट्रवादी काँग्रेस: १२३
◆ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी इतर मित्रपक्ष: २०
◆ इतर लहान पक्ष व अपक्ष उमेदवार: २,६६३

राज्यातील सर्व मतदार केंद्रांवरील ईव्हीएम मशिन्स, कम्प्युटर्स अशी सर्व मतदान यंत्रणा सज्ज झाली असून सर्व कर्मचारी कामाला लागले आहेत. राज्यभरात मतदानासाठी २१ ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे. आपणही मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवार निवडा.