Home महाराष्ट्र परप्रांतीय गावाकडे जाऊन काय खाणारेत? – नितीन गडकरी

परप्रांतीय गावाकडे जाऊन काय खाणारेत? – नितीन गडकरी

0

मुंबईसह अन्य शहरांमध्ये अडकलेले परप्रांतीय मजूर गावाकडे गेले तर काय खाणार, असा प्रश्‍न उपस्थित करत लॉकडाऊन संपल्यावर सुद्धा त्यांची या ठिकाणीच रोजीरोटी सुरू होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

कोरोनाचा विळखा आणि सुरू असणारे देशव्यापी लॉकडाऊन या सर्व परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीय मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना गडकरी म्हणाले, “परप्रांतीय त्यांच्या मूळ गावी परतल्यावर त्यांच्या हाताशी रोजगार तरी कुठे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. परप्रांतीयांना गावाकडे पाठवून उपयोग नाही.उलटपक्षी त्यांना इथेच थांबवून हळूहळू त्यांच्या हाती उद्योग देण्याचा विचार होऊ शकतो,”

राज्यात अडकललेल्या जवळपास साडे सहा लाख परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी परत पाठवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष ट्रेन सोडावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. ज्यावर भूमिका मांडताना गडकरी म्हणाले, “मी त्यांचा विरोध करत नाही; मात्र ही मंडळी गावात गेली तर त्यांना रोजगार आहे कुठे? या मंडळींना त्या ठिकाणी रोजगार न मिळाल्यामुळेच ते मुंबई आणि पुण्यामध्ये आले आहेत. त्यामुळे आता त्यांना रोजगार मिळणे हा मुद्दा महत्त्वाचा आहे’

नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य अनेक राज्ये स्पेशल ट्रेन सुरू करण्यासाठी मागणी करत असल्यामुळे केले असल्याचे समजते. परप्रांतीय मजुरांच्या जमावाच्या घटना न घडणे व लॉकडाउन संपल्यानंतर त्यांना रोजी रोटी मिळावी याबाबत प्रयत्न करणे हे आत्ता महत्वाचे ठरते.