गेल्या २ दिवसांपासून चर्चेत असलेल्या चांद्रयान-२ च्या मोहिमेबाबत आणखी एक आनंदाची बातमी इस्त्रोने दिली आहे. विक्रम लँडरचा संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत परिभ्रमण करत असलेल्या चांद्रयानाद्वारे त्याची लोकेशन मिळवण्यात यश आले आहे असे इस्रो प्रमुख के. सिवन यांनी काल सांगितले होते. याच संदर्भात आणखी एक खुशखबर काही वेळापूर्वी इस्रोकडून मिळाली आहे.
चांद्रयान-२ च्या मोहिमे अंतर्गत काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार विक्रम लँडरला कुठलंही नुकसान झालेलं नसून तो नियोजित जागेच्या अगदी जवळ थोड्या तिरक्या स्थितीत चंद्राच्या पृष्ठभागावर लँड झाला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर इस्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांनी सांगितलं की विक्रमशी पुन्हा संपर्कात येण्याची अजूनही ६० ते ७० टक्के शक्यता आहे. तसेच नव्याने संपर्क प्रस्थापित करण्यासाठी लँडरला अँटेना ग्राउंड स्टेशनच्या कक्षेत असणे आवश्यक आहे असेही इस्रोकडून सांगण्यात आले आहे. विक्रमवर सौर पॅनल लावले असल्याने त्याला ऊर्जा मिळत राहणार आहे त्यामुळे पुढील १४ दिवस इस्रो विक्रमच्या संपर्कासाठी प्रयत्न चालू ठेवणार आहे.