Home राष्ट्रीय अयोध्या प्रकरणाची सुनावणी अखेर पूर्ण; सुनावणी दरम्यान हिंदू मुस्लिमांमध्ये शाब्दिक चकमक; निकाल...

अयोध्या प्रकरणाची सुनावणी अखेर पूर्ण; सुनावणी दरम्यान हिंदू मुस्लिमांमध्ये शाब्दिक चकमक; निकाल अजूनही टांगणीला

0

गेल्या कित्येक वर्षांपासून वादात अडकलेल्या अयोध्या प्रकरणाची सुनावणी अखेर आज १६ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली असून निकाल अजून राखून ठेवला गेला आहे. तसेच यासंदर्भातील निकाल लवकरच जाहीर होणार असल्याचे मीडिया न्यूजमध्ये सांगितले जात आहे. हे प्रकरण हाताळणारे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे येत्या १८ नोव्हेंबरला निवृत्त होणार असल्याने त्यांच्या निवृत्तीआधीच न्यायालयाचा निकाल जाहीर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आज या सुनावणीचा शेवटचा दिवस होता. सुनावणी दरम्यान हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांमध्ये युक्तिवाद चाललेला होता. त्यावेळी अखिल भारतीय हिंदू महासभेचे वकील विकास सिंह यांनी राम जन्मभूमीच्या जागेबद्दल आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी न्यायालयासमोर एक नकाशा सादर केला. मात्र मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी या नकाशावर आक्षेप घेऊन तो फाडला असे मीडिया न्यूजवरून समजले. या प्रकारामुळे संतप्त होऊन रंजन गोगोई यांनी दोन्ही पक्षांना खडे बोल सुनावले. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असली तरी निकाल बाकी असल्यामुळे अयोध्येत कलम १४४ अजूनही लागू आहे.