
राजधानी दिल्ली आगीत होरपळत असतांना एक माणुसकी जिवंत आहे असे भासवणारी घटना काल यमुनाविहार येथे पहायला मिळाली. भाजपच्या नगरसेवकाने हिंसक जमावाच्या तावडीतून एका मुस्लिम दांपत्याला वाचवले.
प्रमोद गुप्ता असे या नगरसेवकाचे नाव असून, ते यमुना विहार वॉर्डमधील भाजपचे नगरसेवक आहेत. गुप्ता हे सोमवारी रात्री शाहिद सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी सिद्दिकी यांचे घर पेटविणाऱ्या दीडशे जणांच्या जमावाला रोखले. सिद्दिकी यांच्या म्हणण्यानुसार, “काल रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ‘जय श्रीराम’ची घोषणाबाजी करत एक मोठा जमाव आमच्या घराजवळून जात होता. या जमावाने आमच्या घराच्या खाली असणाऱ्या एका बुटिकला आग लावली.”
दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. ५६ पोलिसांसह १३० नागरिक जखमी झाले आहेत. रात्री आठ वाजता यमुना विहारमधील नूर-ए-इलाही चौकात ‘घरातून बाहेर पडू नका, अन्यथा गोळी घालण्यात येईल’ असा इशारा पोलिसांकडून देण्यात आलेला आहे. दिल्लीमधील परिस्थिती हाताळण्यास अजित डोवाल यांच्याकडे पुढील सूत्रे देण्यात आली आहेत.