
काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे वाद निर्माण झाले होते व महाराष्ट्रात संताप व्यक्त केला गेला होता. भाजप नेते जयप्रकाश गोयल यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या नावाचे पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकाच्या नावातच मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आल्यामुळे या पुस्तकावर शिवप्रेमींनी टीका केली होती. हे प्रकरण निवळले नाही तोच एका भाजप नेत्याने या घटनेची पुनरावृत्ती केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा या विषयावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे असे मीडिया न्यूजवरून समजले.
आजच दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळू शकले नाही. असे असतांनाही भाजप उपाध्यक्षा उमा भारती यांनी ट्विट करून नरेंद्र मोदींचे कौतुक केले. लोकमतच्या रिपोर्टनुसार उमा भारती यांनी आपल्या ट्विटमध्ये मोदींना ‘छत्रपती’ असे संबोधून नव्या वादाला तोंड फोडले. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, “संपूर्ण भारत देशाच्या जनतेने मोदींना आणि मोदींनी संपूर्ण जनतेला आत्मसात केले आहे. छत्रपती मोदी जिंदाबाद.” या ट्विटवर अनेक शिवप्रेमींनी संतापग्रस्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ‘शिवाजी महाराजांनी जितके कार्य केले त्याच्या कणभर तरी करून दाखवा’, ‘मोदींना छत्रपती ही पदवी शोभून दिसते का?’ अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया या पोस्टवर केलेल्या दिसत आहेत. हे सर्व पाहता यातून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढे काय होईल ते वेळच सांगेल.