
ईशान्य दिल्लीत CAA विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यात पोलीस कर्मचारी रतन लाल मरण पावले असून दोन पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीच्या गोकुलपुरीजवळ भजनपुरा भागात आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. त्यात कॉन्स्टेबल रतन लाल गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. या हिंसाचारात पोलीस आयुक्त वेद प्रकाश शुक्ला आणि अमित शर्मा हे सुध्दा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
हिंसाचारदम्यान आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्याही जाळून खाक केल्या. सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इशान्य दिल्लीत १० ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विनंती केली आहे.