Home राजकीय ऑपरेशन लोटसची पोलखोल; कर्नाटकातील भाजपचे सरकार बरखास्त करण्याची काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी

ऑपरेशन लोटसची पोलखोल; कर्नाटकातील भाजपचे सरकार बरखास्त करण्याची काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी

0

नुकत्याच आलेल्या वृत्तांतानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून कर्नाटकातील भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ संदर्भातील गोपनीय माहिती समोर आली आहे. ही गोष्ट काँग्रेसने उचलून धरली असून कर्नाटकातील भाजपचे सरकार बरखास्त करावे व भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांना पदावरून काढावे असे राष्ट्रपतींना सूचित केले आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओत अमित शहा, येडीयुरप्पा तसेच भाजपचे इतर नेते एका बैठकीत बसलेले दिसत होते व येडीयुरप्पा सर्वांना संबोधून बोलत असल्याचे समजत होते. या व्हिडिओत केवळ ऑडिओ ऐकायला येत आहे. हा व्हिडीओ एका पेन ड्राइव्ह मध्ये सेव्ह करून कर्नाटकच्या राज्यपालांच्या माध्यमातून काँग्रेसने तो राष्ट्रपतींना पाठवला आहे. त्यासोबत ‘काँग्रेस-जेडीए आघाडीच्या १५ आमदारांना पैशांचं आमिष दाखवून राजीनामा द्यायला लावला व काँग्रेस-जेडीएचं सरकार पाडलं’ अशी माहिती देणारं एक निवेदनही राष्ट्रपतींना पाठवण्यात आलं.

असे असले तरीही मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. “आमदारांना आम्ही कुठलंही आमिष दाखवलं नसून काँग्रेस-जेडीए सरकारवरील नाराजीमुळे त्यांनी राजीनामा दिला” असे येडीयुरप्पा यांनी स्पष्ट केले. दरम्यान काँग्रेस नेते के. सी. वेणूगोपाल यांनी याबद्दल सर्वोच्च न्यायालयात तक्रार करणार असल्याचे सांगितले.