Home राजकीय घरी परत जाणाऱ्या सर्व मजुरांचा खर्च करणार, काँग्रेसची मोठी घोषणा

घरी परत जाणाऱ्या सर्व मजुरांचा खर्च करणार, काँग्रेसची मोठी घोषणा

0

कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यासाठी भारतीय रेल्वे भाडं आकारणार आहे. तोच मुद्दा आता सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील संघर्षाचे नवे कारण सुद्धा बनला आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मजूर आणि कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचे जाहीर केले.

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे.शुक्रवारी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सरकारने विशेष गाड्या सोडण्यास सुरुवात केली. रेल्वे परिपत्रकानुसार स्थानिक सरकारी अधिकारी सर्व पडताळणी करून मजुरांना तिकिटे देतील आणि त्यांच्याकडून तिकीट भाडे सुद्धा आकारले जाईल. मजूर आणि कामगारांकडून आकारण्यात येणारी तिकिटाच्या स्वरूपातील एकूण रक्कम ते अधिकारी रेल्वेला देणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोदी सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं असून, त्यांनी ते ट्विट केले आहे. ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने निर्णय घेतला आहे की, राज्य कॉंग्रेस कमिटीच्या प्रत्येक विभागानं गरजू मजूर व कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा प्रवास खर्च उचलावा. त्यांच्या तिकिटांचा खर्च करण्यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलावीत. खरं तर राज्यांवर मजुरांच्या तिकिटाचा खर्च टाकून आणि त्यांच्याकडून भाडे वसूल केल्यानं विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळेच या स्थलांतरित कामगारांच्या प्रवासाचा खर्च केंद्राने उचलावा, अशी मागणी भाजपा विनाशासित राज्यांची आहे.