Home राष्ट्रीय मशिदीत पार पडला हिंदू विवाह सोहळा, मुस्लीम बांधवांनी दिलं १० तोळं सोनं...

मशिदीत पार पडला हिंदू विवाह सोहळा, मुस्लीम बांधवांनी दिलं १० तोळं सोनं व दोन लाखांची भेट!

0

अंधश्रद्धा व जातीवाद देशाला दिवसेंदिवस पोकळ करीत आहेत. मात्र केरळमध्ये नुकतंच जातीय सलोख्याचं एक जगावेगळं उदाहरण पहायला मिळालं. लोकसत्ताच्या एका रिपोर्ट नुसार केरळ येथील अलपुझा जिल्ह्यातिल कायमकुलम येथे मुस्लीम समाजाने हिंदू तरुणीचं लग्न लावून देत सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आहे. सध्या राज्यातच नाही तर देशातही हा चर्चा विषय ठरला असून याचं भरभरून कौतुक होत आहे.

मिळालेल्या अधिक माहिती नुसार हे लग्न १०० वर्ष जुन्या चेरावल्ली जमात मशिदीत लावण्यात आलं असून अगदी हिंदू धर्माच्या रीतिरिवाज व पद्धतींना धरूनच पार पडलं. हे लग्न घडून येण्यामागे नवरी अर्थात अंजूची दयनिय परिस्थिती होती. अंजूचे वडील हृदयविकाराने देवाघरी गेले तर आई एकटी काय काय करेल. घरात तीन मुली, त्यांचं लग्न लावायचं आणि परिस्थितीचे तीन तेरा झाले होते म्हणून बिंदू अर्थात अंजूच्या आईने मशिदीच्या व्यवस्थापणाकडे यासाठी मदत मागितली व त्यांनी मदत केली सुद्धा!

मशिदीच्या व्यवस्थापणाने लग्नाची सर्व व्यवस्था करून लग्नासाठी १९ जानेवारी दुपारी १२ वाजून १० मिनिटांचा मुहूर्त निश्चित केला. एवढंच नाही तर मशिदीच्या वतीने पत्रिका छापून वाटण्यात देखील आल्या होत्या. त्याचबरोबर लग्नात १००० पाहुण्यांच्या जेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. मशीद समितीने मुलीला सोन्याचे दागिने व या नवदाम्पत्ताला आयुष्याची नवी सुरवात करण्यासाठी दोन लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. अंजूच्या आई बिंदू यांनी आपल्या मुलीचं लग्न आशा थाटात होईल असा विचारही केला नव्हता. त्यांनी मशीद समितीचे मनापासून आभार मानले. महत्वाचं म्हणजे स्वतः केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या लग्नाचे फोटो ट्विट करून नवविवाहित वधू वराला शुभेच्छा दिल्या आहे व मुस्लिम बांधवांचं कौतुक केलं.