Home तंत्रज्ञान भारत देणार चीनला आणखी एक दणका; पब्जी सहित आणखी बरेच चिनी ऍप्स...

भारत देणार चीनला आणखी एक दणका; पब्जी सहित आणखी बरेच चिनी ऍप्स होणार बॅन?

0

भारत-चीन मधील तणाव शिगेला पोहचत असतांनाच भारत चीनला दणका देण्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी टिकटॉक, शेअर इट, कॅम स्कॅनर मिळून एकूण ६९ चिनी ऍप्स बॅन केल्यानंतर भारत सरकार आता आणखी २७५ चिनी ऍप्स बॅन करण्याच्या तयारीत आहे. यासाठी सरकारने २७५ ऍप्सची यादी तयार केली आहे असे लोकमतच्या रिपोर्टनुसार समजले. तसेच हे ऍप्स राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि गोपनीयतेसाठी धोकादायक आहेत का याची तपासणी सरकार करीत आहे असेही या रिपोर्टवरून कळले.

या यादीत भारतात लोकप्रिय असलेला मोबाईल गेम ‘पब्जी’चाही समावेश आहे. याशिवाय अलीबाबा एक्सप्रेस, शाओमी जिली, रेसो , युलाईक्स हे ऍप्सदेखील या यादीत आहेत. लोकमतच्या अधिक माहितीनुसार या २७५ ऍप्सच्या यादीतील ज्या ऍप्समध्ये धोकादायक बाबी आढळतील ते ऍप्स बॅन केले जाणार आहेत, तसेच ज्या ऍप्समध्ये काही आक्षेपार्ह बाब आढळणार नाही ते ऍप्स बॅन केले जाणार नाही.

दरम्यान भारत सरकार सर्वच ऍप्ससाठी कायद्यांची नियमावली तयार करीत आहे. भारत सरकार याबाबतीत कठोर निर्णय घेणार असून देशाची सायबर सुरक्षा बळकट करण्याची सरकारची योजना आहे. भारत-चीनमधील सीमेवरील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यामुळे चीनबद्दल भारतात संतापाची लाट आहे.